आज गुरुपौर्णिमा- आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता
व्यक्क्त करण्याचा दिवस .
आपले
आई-वडिल, आजी-आजोबा, थोरली भावंड, वडिलधारी मंडळी हया सर्वांकडून विविध
लहान-मोठया गोष्टी शिकत-शिकत आपण शाळेमध्ये प्रवेश करतो. तिथे आपल्या आयुष्यात
आपल्या पहिल्या वर्गशिक्षिका दाखल होतात (पहिल्याच
खेपेस वर्गशिक्षक येण्याची शक्यता खूपच कमी). अ, ब, क, ड (अथवा ए, बी,
सी, डी) शिकत-शिकत आपली गाडी पाढे, शिवाजी महाराज, स्वातंत्र्यलढा, बीजगणित,
सुभाषिते, रासायनीक समीकरणे अशा अनेक स्टेशनांना पार करत-करत बारावीपर्यंत येऊन
ठेपते. पुढे उच्चशिक्षण घेताना अनेक तज्ञांचे मार्गदर्शन आपल्याला लाभते. त्याचा
लाभ घेत आपण दुनियादारीसाठी सज्ज होतो. ह्या टप्प्यावर आपल्या (पेशाने शिक्षक
असलेल्या) गुरूंच्या आणि आपल्या वाटा वेगळ्या होतात. इथवरच्या प्रवासात आपल्यावर
शिक्षणाचे संस्कार करणाऱ्या शिक्षकांचा मोठा हातभार असतो. पुढील प्रवासात त्यांची
शिकवण व त्यांचे संस्कार आपल्यासोबत असतात.
स्वतःचा विषय शिकवता-शिकवता
प्रत्येक गुरु आपापल्या पद्धतीने अजून एक गोष्ट आपल्याला शिकवतात – ती म्हणजे स्वतः
स्वतःचे शिक्षक कसे बनावे व त्याच बरोबर सतत विद्यार्थीदशेत का राहावे. कारण
त्यांना माहित असते की एकदा का औपचारिक शिक्षण संपले की प्रत्येक अडी-अडचणीच्या
वेळी आपल्याला स्वतःच स्वतःचे शिक्षक बनावे लागते किंवा एखाद्या जाणकार व्यक्तीचे
मार्गदर्शन पुढाकार घेऊन मिळवावे लागते. चार-चारदा, प्रेमाने “समजल ना बाळांनो तुम्हाला” अस विचारत नाही कोणी. आपल्यातल्या विद्यार्थ्याला जिवंत
ठेवावे लागते आणि पुस्तके, इंटरनेट, प्रसारमाध्यमे आणि स्वानुभव ह्यांच्या
सहाय्याने नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. तसेच काही प्रसंगी मित्र-मैत्रिणी,
सहकर्मचारी, नवरा/बायको, वडिलधारी मंडळी अथवा वरिष्ठ अशा त्या-त्या वेळी योग्य
व्यक्तीस गुरु मानावे लागते. ज्यांना हे सर्व जमतं त्यांचा सर्वांगीण विकास होतो.
काही दिवसांपूर्वी एका एकदिवसीय
कोर्सच्या निमित्ताने हे विचार आले माझ्या मनात. नवीन काहीतरी शिकण्याच्या
उद्देशाने विविध वायोगटामधील व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. विषय काही पुस्तकी
नव्हता आणि प्रशिक्षक त्या विषयातील जाणकार व अनुभवी होते. त्यांनी अगदी
सुरुवातीलाच सांगितले की ज्या स्लाईड्स मी समोर दाखवणार आहे त्यातील प्रत्येक शब्द
उतरवून घेऊ नका, नंतर नोटस् देण्यात येतील. ही प्रस्तावना झाल्यानंतर, उशीर
झाल्यामुळे, एका मध्यमवयीन सहभागीनीने प्रवेश केला. माझ्याच शेजारच्या रिकाम्या
खुर्चीत त्या घाई-घाईत आसनस्थ झाल्या. सर्व जण काय करत आहेत, प्रशिक्षक काय बोलत
आहेत ह्या कडे जराही लक्ष न देता, स्लाईड वरील शब्द न् शब्द उतरवून काढू लागल्या.
प्रशिक्षकांच्या हे लक्षात येताच त्यांनी लगेचच त्यांना तसे करण्यापासून थांबवले व
आपली प्रस्तावना पुन्हा एकदा दिली. ह्यानंतरही एक दोघांनी ‘तुम्ही जे सांगत आहात
त्याच्या नोटस् नंतर नक्की द्याल ना’ असं दोन-तीनदा विचारत खात्री करून घेतली. समोरची
व्यक्ती जे सांगते आहे ते आपण ऐकून, त्यावर विचार करून नवीन विषय समजून घेउ शकतो
ह्याची खात्रीच नव्हती बहुदा त्यांना. उजळणी म्हणून अथवा काही दिवसांनी जेव्हा
विसर पडला असेल तेव्हा सर्व नीट आठवण्यासाठी नोट्स व आत्ता समजून घेण्यासाठी डोळे,
कान व मेंदू ह्या सरळ-साध्या गोष्टी का लक्षात नाही आल्या त्यांच्या? नवीन गोष्टी
शिकण्यासाठी ज्ञानेंद्रिये कायम कार्यरत असू दयावीत ही आपल्या गुरूंची शिकवण का विसरतो
आपण ?
वरील घटना तशी साधीशीच आहे, पण
आपल्या गुरुजनांच्या ‘स्वतःमधील विद्यार्थ्याला नेहमीच जीवंत व सतर्क ठेवावे’ ह्या
शिकवणीची आठवण करून देणारी आहे.
आज गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्या
गुरुजनांबददल कृतज्ञता व्यक्त करत तुमच्या समोर हे विचार मांडावेसे वाटले म्हणून
हा ब्लॉगचा खटाटोप.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
!!!!
- Kalindi Joshi
With Amol Vishwas Joshi, Interior Designer, AAkruti Interiors, Kandivli, Mumbai
9967534621, For more details, click here -->>