Amol Joshi, Interior Designer

Sunday, January 11, 2015

नुतनीकरण स्वयंपाकघराचे

प्रेमाचा मार्ग पोटातून हृदयाकडे जातो ह्या उक्तीला अनुसरूनच स्वयंपाकघराला संपूर्ण घराचे हृदय अशी पदवी बहाल केली गेली असावी. ‘Interior designing’चा अभ्यास करत असताना ‘kitchen is the heart of the home’ असे स्वयंपाकघराचे वर्णन वाचनात आले होते. परंतु जेव्हा शिक्षण आटोपून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली तेव्हा घरातील कर्त्या स्त्रीचा स्वयंपाकघराच्या नुतनीकरणासंदर्भातील उत्साह अनुभवला आणि वाचनात आलेले स्वयंपाकघराचे वर्णन किती सार्थ आहे ह्याची जाणीव झाली.


माझा आजवरचा अनुभव असे सांगतो कि प्रत्येक कर्त्या स्त्रीला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस आरोग्यपूर्ण व रुचकर पदार्थ करून खाऊ घालावेत असे मनोमन वाटत असते. त्यासाठी ती नेहमीच प्रयत्नशील असते. परंतु नोकरी/व्यवसाय व इतर जबाबदार्‍यांनी तिचे वेळेचे गणित खूपच अवघड करून ठेवलेले असते. ह्यातून मार्ग काढण्यासाठी ती कुटुंबातील इतर मंडळींची, वरकामाला नेमलेल्या व्यक्तीची तसेच आधुनिक उपकरणांची मदत घेते. ह्याच कारणास्तव सर्व मदतनीस मंडळींना सुटसुटीतपणे काम व वावर करता यावा, सर्व उपकरणे सोयीस्कर जागी ठेवता यावीत व आवश्यक ते सामान साठवून ठेवता यावे अशा सोयी असलेले स्वयंपाकघर हि तिची गरज ठरते.



नुतनीकरणाचे काम सुरु करण्याआधी जेव्हा मी त्या घरातील सदस्यांशी चर्चा करतो तेव्हा मला त्यांच्या सवयी, आवडी-निवडी व गरजांचा अंदाज येतो. स्वयंपाकघराच्या बाबतीत वेगवेगळ्या गरजा समोर येतात. कोणाची साठवण अगदी वर्षभराची असते, तर कोणाची महिन्या-दोन महिन्यांची. त्यानुसार सामान ठेवण्याची जागा निश्चित करावी लागते. कोणाकडे ‘microwave oven’ पासून ‘dish washer’ पर्यंत अनेक आधुनिक उपकरणांची सोय करावी लागते तर कोणाकडे कमी जागेत एका वेळेस दोन व्यक्तींना काम करता यावे अशी रचना करावी लागते. ‘Borewell’चे पाणी वापरावे लागत असल्यास ‘RO water purifier’ची गरज भासते. फक्त पिण्याचे पाणी त्यातून ‘filter’ करायचे कि इतर कामांसाठी लागणारे पाणीदेखील; ह्यावर त्या ‘purifier’ची जागा, आकार व त्या अनुषंगाने ‘plumbing’ निश्चित करावे लागते. त्याशिवाय आधुनिक शेगडी, धुराचा त्रास टाळण्यासाठी चिमणी, तळणाची आधुनिक उपकरणे, उष्टे-खरकटे ह्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी ‘under sink crusher’ ह्या व अशा अनेक आधुनिक सोयी-सुविधांची गरज आजच्या कर्त्या स्त्रीला भासू शकते. सामानाची साठवण करण्यासाठीसुद्धा आधुनिक कपाटे, ‘trolleys’, ‘drawers’ इत्यादी सध्या उपलब्ध आहेत; ज्यांचे दरवाजे हलक्याशा धक्क्यानेदेखील अलगद बंद होतात. वरवर क्षुल्लक वाटणारे कित्येक बदल लहान-सहान कामांचा थोडा-थोडा वेळ वाचवतात. त्यामुळे जो एकत्रित परिणाम साधला जातो तो तारेवरची कसरत करत स्वयंपाकघराची धुरा सांभाळणार्‍या कर्त्या स्त्रीसाठी फार मोलाचा असतो. म्हणूनच अशा सोयी-सुविधांच्या बाबतीत आजच्या स्त्रिया आग्रही असतात. त्यांच्या गरजेनुसार स्वयंपाकघराची मुलभूत रचना निश्चित करावी लागते व त्यामुळे सरसकट एकच-एक रचना प्रत्येक स्वयंपाकघरासाठी ठरवणे योग्य नसते. अर्थात, स्वयंपाकघराचे नुतनीकरण करताना काही मुलभूत नियमांचा उपयोग निश्चितच होतो.


स्वयंपाकघराचे तीन मुख्य घटक मानले जातात – ओटा, ‘sink’ व ‘refrigerator’. हे तीन घटक एकमेकांपासून कमीत-कमी व जास्तीत-जास्त किती अंतरावर असावेत ह्याबाबतचे नियम पाळल्यास स्वयंपाक करणार्‍या व्यक्तीसाठी सोयीस्कर वातावरण निर्माण करता येते. ह्याचबरोबर इतरही काही गोष्टींचे एकमेकांपासून अंतर काही विशिष्ट नियमांनुसार असल्यास स्वयंपाकघरात सुटसुटीतपणे वावर करता येतो. उदाहरणार्थ मुख्य दरवाजा व खिडक्यांचे दरवाजे (उघडल्यानंतर) ह्यांचे जवळील गोष्टींपासून अंतर; ‘storage units’, ‘refrigerator’, ‘microwave oven’ इत्यादींचे (दरवाजे उघडल्यानंतर) एकमेकांपासून व इतर गोष्टींपासून अंतर; ओटा व त्यावरील ‘wall mounted storage units’मधील अंतर; ओट्याची उंची इत्यादी. ह्या तांत्रिक बाबींबरोबरच रंगसंगती, सुशोभिकरणाच्या दृष्टीने आवश्यक असणारे बदल केले कि सोयी-सुविधांनी सज्ज अशा स्वयंपाकघराला घरपण येते.



‘Home minister’च्या गरजा, स्वयंपाकघराच्या मर्यादा व जागेच्या सुयोग्य वापरासंदर्भातील नियम ह्या सर्व घटकांचा विचार करून सर्व सोयींनी सुसज्ज, सुटसुटीत व आकर्षक स्वयंपाकघर घडवणे हे एक ‘interior designer’ म्हणून माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक असते खरे! परंतु त्याचबरोबरीने; घरातील ज्या जागेतून दरवळणार्‍या चहाच्या सुगंधाने सर्व मंडळी ताजीतवानी होत उठतात, जिथे दिल्या गेलेल्या फोडणीवर अनेक रुचकर पदार्थ शिजतात, जिथे पोळी टम्म फुगते व कुटुंबियांची उर्जा फुलवते, जिथे शिजणारा वाफेभरला भात सार्‍या घराचा थकवा दूर करतो आणि ज्या जागी फर्माईशींना दाद व पाककलेला वाव मिळून सर्वांची माने राखली जातात; त्या ‘heart of the home’चे नुतनीकरण हा नक्कीच एक आनंददायी अनुभव असतो. 


- अमोल विश्वास जोशी 



हा लेख लोकसत्तेच्या शनिवारच्या पुरवणीमध्ये - वास्तुरंग मध्ये, दि. १० जानेवारी २०१५ रोजी प्रसिद्ध झाला आहे. पुढील लिंकद्वारे आपणास हा लेख लोकसत्तेच्या साईटवर वाचता येईल >> लिंक