Amol Joshi, Interior Designer

Tuesday, August 19, 2014

गणपती बाप्पांची मॅनेजमेंटची पाठशाळा





‘अरे ऐकलस का! वीस दिवसांवर गणपती आलेत. दोन रविवार आहेत मध्ये फक्त! ह्या वर्षी मखर कसा करायचा काही ठरवलं आहेस कि नाही?’ – सौ.

‘हो तर! कल्पना डोक्यात तयार आहे. बच्चे कंपनीला हाताशी धरून प्रत्यक्षात उतरवायची तेवढी बाकी आहे. पाहुण्यांची यादी केली आहेस का तू? मखरासाठी लागणाऱ्या सामानाची यादी करतो मी तयार. श्री.

‘गुरुजींना फोन करायची जबाबदारी माझी.’ – श्रींचे वडील

ह्या अशाच काहीशा संवादांनी घरोघरी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु होते. जागोजागी भक्तांच्या घरी भेट देण्यास सज्ज असलेल्या गणपतीच्या मुर्त्या दिसू लागतात आणि लागलीच तयारीला किती दिवस राहिले आहेत हाताशी ह्याची मोजदाद होते. मग ‘तयारीला सुरुवात केली पाहिजे बर आता’ असं घरी फर्मान निघत आणि कामाची यादी, कामाचं वाटप, प्रत्येक गोष्ट कधीपर्यंत आटोपली पाहिजे त्याच वेळापत्रक, लागणार सामान-सुमन व खर्चाचा अंदाज ह्याबद्दल चर्चा होते. त्यानंतर प्रत्येक जण उत्साहाने आपापल्या कामाला लागतो.


दरवर्षी नित्यनेमाने होणारी हि गणेशोत्सवाची तयारी म्हणजे आजच्या युगात ज्या व्यवस्थापनशास्त्राला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे त्या अभ्यासशाखेतील ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट ह्या विषयाचे साधे, सोप्पे, घरगुती परंतु तितकेच प्रभावशाली उदाहरण आहे हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही. हि तयारी फारशी औपचारीक पद्धतीने केली जात नसल्यामुळे ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने कधी त्याबद्दल विचार केला जात नाही. परंतु एक इंटेरियर डिझायनर असल्यामुळे सतत प्रोजेक्ट बद्दल विचार केला जातो माझ्याकडून आणि त्यामुळेच हि गणेशोत्सवाची व ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंटची सांगड सुचली मला. 



वर्षातून एकदाच, एका ठराविक काळासाठी साजरा होणारा गणेशोत्सव एका प्रोजेक्टच्या रूपानेच येतो नाही का. गणपतीची मूर्ती, पाहुणेमंडळी, प्रसाद, मखर व गृहसजावट ह्या आणि अशा विविध मुख्य कामांची एक यादीच करावी लागते तयारीला सुरुवात करताना. हीच नाही का आपली ‘टास्क लिस्ट’. ह्या कामांचे मग वाटप होते व घरातील प्रत्येक सदस्यास काही ना काही तरी काम दिले जाते. कामाचे वाटप करताना आपण नकळतपणे प्रत्येक सदस्याच्या क्षमतेचा व कौशल्याचा विचार करतो. म्हणजे अगदी शाळकरी मुले असली घरात तरी त्यांची कामातून सुटका नसते. त्यांना ‘सोसायटीमधील’ आमंत्रितांची यादी देऊन सगळ्यांना आमंत्रण करण्यास पिटाळले जाते. हे घरोघरी जाण्याचे धावपळीचे काम लहान मुलांची शारीरिक उर्जा ह्या कौशल्याचा विचार करूनच तर त्यांना दिले जाते. हाच नियम इतर कामांच्या बाबतीत लागू पडतो. थोडक्यात काय, तर ‘डेलीगेशन ऑफ टास्क्स’ ह्या ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या महत्वाच्या घटकाचा आपण नकळतपणे अवलंब करतो. आता प्रत्येकजण आपल्या वाट्याला आलेलं काम व्यवस्थित पार पडाव म्हणून मुख्य ‘टास्क’ला ‘सब-टास्क’मध्ये विभागतो. शिवाय कोणत काम कधीपर्यंत झाल पाहिजे ह्याचादेखील मनातल्या मनात हिशोब मांडला जातो. कधीकधी एखाद काम दुसऱ्या एखाद्या कामावर अवलंबून असतं. मोदक करण्याची जबाबदारी सासू-सुनेने मिळून घेतली असेल, परंतु त्यासाठी लागणार सामान आणण्याची जबाबदारी जर सासारेबुवांची असेल तर आधी त्यांचं काम पार पडण आवश्यक असतं. कामाचं वेळापत्रक आखताना ह्या अशा ‘डीपेन्डंट टास्क्स’चा विचारदेखील करावा लागतो. शिवाय लागणार सामान कुठून आणायचं, खर्चाची मर्यादा काय असावी, वरकामाला वा इतर कुठल्या कामाला जास्तीच मनुष्यबळ हवं का इत्यादी इतरही काही बाबींचा विचार करावा लागतो. सरतेशेवटी कुटुंबातील तसेच इतर मंडळी दिलेलं काम वेळेत व व्यवस्थित पार पाडत आहेत कि नाही ह्यावर स्वतःचे काम करता करता देखरेख ठेवणारी एक ‘प्रोजेक्ट मॅनेजरदेखील आवश्यक असते.

आता पटलं ना कि दरवर्षी गणपती बाप्पा येती ‘मॅनेजमेंटचे धडे शिकवाया.

गणेशोत्सव जवळ आला कि कित्येक घरांमध्ये गृहसजावटीचे काम हाती घेतले जाते. घरातील ‘प्रोजेक्ट मॅनेजरमग आमच्यासारख्या ‘इंटेरियर डीझायनरवर’ हि जबाबदारी सोपवतात व त्यांच्या घरातील गणेशोत्सव ह्या ‘प्रोजेक्ट’च्या बरोबरीने आमचे ‘प्रोजेक्ट’ सुरु होते.



आमच्या ‘प्रोजेक्ट’मध्ये सुद्धा अथ पासून इतिपर्यंत अनेक बारकाव्यांकडे लक्ष पुरवावे लागते. घराचे ‘इंटिरियर’ असल्यास सुरवातीला किती सदस्य आहेत, त्यांच्या काय गरजा आहेत, त्यांच्या काय कल्पना आहेत हे सर्व विचारात घ्यावे लागते. व्यावसायिक अथवा कार्यालयीन वापरासाठीची जागा असल्यास; किती कर्मचारी आहेत, कामाचे स्वरूप काय आहे, ग्राहकांची ये-जा किती प्रमाणात व कोणत्या कारणासाठी असेल अशा सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. मग नक्की काय-काय करावे लागणार आहे, त्यासाठी कोणते व किती सामान लागेल, कामगार कोणते व किती दिवसांसाठी लागतील ह्याचा विचार करून खर्चाचा तसेच वेळेचा अंदाज काढावा लागतो. त्यावर ‘क्लायेंट’बरोबर चर्चा झाली कि मग आमच्या ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा पुढचा व महत्वाचा टप्पा सुरु होतो. तपशीलवार ‘डिझाईन’ तयार करणे. त्यानुसार कामांची क्रमवार रचना करणे. मग जी कामे प्रथम हाती घ्यायची असतील त्यासाठीचे सामान व कामगार ह्यांची व्यवस्था करणे. त्यासाठी ‘क्लायेंट’च्या मदतीने पैशांची व्यवस्था करणे. पाठवण्यात आलेले सामान योग्य त्या दर्जाचे आहे कि नाही ह्यावर लक्ष ठेवणे. सुरु असलेल्या कामावर देखरेख ठेवणे व त्याची वेळेत सांगता होते आहे कि नाही ते पाहणे. ते आटोपत आले कि लागलीच पुढील कामाची तयारी सुरु करणे. आमचे काम हे असेच अखंड सुरु राहते, ठरवलेल्या तारखेपर्यंत ‘प्रोजेक्ट’ समाप्त करण्यासाठी.

अहो, ‘इंटिरियर डिझायनर’ असलो तरी आमचे काम फक्त ‘डिझाईन’ तयार केले म्हणजे आटोपत नाही ना. म्हणून हा सर्व खटाटोप, ‘क्लायेंट’चा खटाटोप वाचवण्यासाठी. कारण तेच तर काम आहे ना आमचं. ‘क्लायेंट’च्या जागेचा कायापालट करण्याची संपूर्ण जबाबदारी शिरावर घेतल्यावर त्यांना निव्वळ रंगसंगती व इतर पसंतीसाठी तसेच गरजेनुसार, टप्या-टप्याने आर्थिक बाबींमध्ये लक्ष घालावे लागावे व इतर सर्व व्यवस्थापन हे आपले कर्तव्य असावे हाच तर आमच्या सेवेमागील उद्देश आहे.

गणेशोत्सवाआधी पूर्ण करावयाची ‘प्रोजेक्ट्स’ मी नुकतीच पूर्ण केली. चांगलं काम केल्याचं समाधान देऊन गेलीत ती ‘प्रोजेक्ट्स’ मला. आपलं ‘गणेशोत्सव’ हे ‘प्रोजेक्ट’ मात्र अजूनही जोरदार सुरु असेल नाही. ते व्यवस्थित पार पडाव व आपणास आनंद देऊन जावं हीच आमची सदिच्छा. पुढे जाऊन ‘दिवाळी’ हे ‘प्रोजेक्ट’ जेव्हा हाती घ्याल तेव्हा आमची काही मदत होणार असल्यास जरूर कळवावे. आम्ही आपली सेवा करण्यास सदैव उत्सुक आहोत. 




गणपती बाप्पा मोरया! 

- अमोल विश्वास जोशी 




No comments:

Post a Comment