Amol Joshi, Interior Designer

Saturday, September 7, 2013

गणपती बाप्पा मोरया



"ह्या वर्षी कोणा - कोणाकडून आमंत्रण आहे गणपतीच?" - मी

आमंत्रणांचा मनातल्या मनात हिशोब मांडत अमोल किती जणांकडे जाऊन यायच आहे ते सांगतो. कोणा -कोणाकडे दीड दिवसाचे गणपती आहेत हि माहिती देखील पुरवतो. 

"दुपारी ३ वाजता निघूयात घरुन. आधी अंधेरीला जाउ, तिथून बोरीवली आणि शेवटी चारकोप." - अमोल 

"चालेल. पार्ल्याला आणि दादरला नंतर जाउ. पहिल्या दिवशी दीड दिवसाच्या गणपतींच दर्शन महत्वाच." - मी 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रक्षाबंधन आणि दहीहंडी हे सण साजरे झाले कि मुंबईला वेध लागतात गणेशोत्सवाचे. बाजार मखर आणि इतर सजावटीच्या साहित्याने फुलून निघतो. जागोजागी सार्वजनिक गणेश मंडळांचे मंडप तसेच गणेशमूर्ती विक्रेत्यांचे मंडप दिसू लागतात. गणेशभक्तांच्या घरी पोहोचण्याची वाट बघत असलेल्या अनेक सुबक गणेशमुर्त्या अशा मंडपांमध्ये रचून ठेवलेल्या दिसू लागतात. अन मग आमचे दोघांचे वरीलप्रमाणे संवाद सुरु होतात. 

आमंत्रणे अंधेरी पासून डोंबिवलीपर्यंत कुठूनही असण्याची शक्यता असते. काही जणांकडे अगदी दर वर्षी येतात गणपती, तर काही जणांकडे त्यांच्या इतर नातलगांकडे हजेरी लावून झाल्यानंतर ठराविक वर्षांनी गणपती बाप्पांचे आगमन होते. दरवर्षी साधारण तीन-चार आमंत्रणे अपेक्षित असतात. त्यामुळे आमच्या दोन्ही घरी गणपती बाप्पा येत नसले तरीही आम्ही आप्तेष्टांकडे बाप्पाच दर्शन घेत-घेत हा सण अगदी थाटात साजरा करतो. 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आप्तेष्टांना भेटण्याचा योग एखाद्या रविवारीच येतो. आणि त्या दिवशी ऑफिसच्या कामाबरोबरच घरातील कामालादेखील सुट्टी असावी असा विचार करत एखाद्या छानश्या हॉटेलमध्ये भेटण्याकडे कल असतो सर्वांचा. त्यामुळे एकमेकांच्या घरी जाण्याचे प्रसंग कमीच येतात. गणेशोत्सवामध्ये मात्र एकमेकांकडे आवर्जून जाण-येण होत. घरातील सर्वच मंडळींशी भेट होते. गप्पा होतात. दर्शनाला आलेल्या इतर पाहुणेमंडळींशी ओळख होते. आपलेपणा वाढतो. यजमान मंडळींना येणाऱ्या-जाणाऱ्यांच आगत-स्वागत करून आनंद मिळतो तर पाहुणेमंडळीना गणेशोत्सवानिमित्त नटलेल्या-सजलेल्या घरी उत्साही यजमानांना भेटून छान वाटत. अप्तेष्टांबरोबरचे आपले नातेसंबंध घट्ट व्हायला असे सण आणि उत्सव नक्कीच मदत करतात. भेटीगाठींच्या आड येणारे कामकाजाचे अडथळेच विघ्नहर्ता काही काळासाठी का होईना दूर करतो गणेशोत्सवादरम्यान!

गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाच्या स्वागताबरोबरच आपण उत्साही वातावरणाच, गोड-धोड पक्वान्नाच, स्वच्छतेच, सौंदर्याच आणि आपलेपणाचदेखील स्वागत करत असतो. जोपर्यंत देवबाप्पाला भक्त, मोदकाला खवय्ये, सजावटीला दाद, आरती म्हणण्यासाठी साथ आणि आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या माणसांचा सहवास लाभत नाही तोपर्यंत गणेशोत्सव साजरा केला अस म्हणता येण जरा अवघडच, नाही का?

तेव्हा ह्या वर्षीदेखील आपणा सर्वांचा गणेशोत्सव उत्साहात, आनंदात आणि आप्तेष्टांच्या सहवासात साजरा होवो हि सदिच्छा!

गणपती बाप्पा मोरया!!!!!!!


- Let your residence be ever ready for celebrations, to welcome loved ones and to share love and fun filled moments with them.

For a perfect makeover of your residence - contact:
Amol Vishwas Joshi, Interior Designer, AAkruti Interiors on 9967534621

Need-based and choice-based renovation is the motto of AAkruti Interiors.







No comments:

Post a Comment