दिवाळी म्हणजे, दिवाळी म्हणजे… दिवाळी असते
तुमची आणि आमची म्हणावं तर वेगळी, म्हणावं तर सेम असते
पावसाळा संपत आला कि तयार शेतमालाच्या रूपाने वर्षभराच्या मेहनतीचे फळ चाखण्यासाठी शेतकरी पूर्वीदेखील सुसज्ज व्हायचा आणि आजदेखील होतो. त्याच्याच बरोबरीने, आजच्या काळात ह्या सुमारास, लहान-मोठ्या उद्योगांमधील उद्योजक व कर्मचारी आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांचा लेखा-जोखा घेत असतात. बरकत असेल तर नफा वा 'बोनस' अथवा 'इनसेनटीव' कमावून हि मंडळी आनंदात असतात. थोडक्यात काय, तर आर्थिक दृष्ट्या अश्विन व कार्तिक महिना पूर्वीदेखील महत्वाचा होता आणि आजदेखील आहे. आणि म्हणूनच… दिवाळी (एक धार्मिक सण ह्या नात्याने कमी, तर एक उत्सव म्हणून) पूर्वीदेखील जल्लोषात साजरी व्हायची आणि आतादेखील होते.
दिवाळी म्हणजे खरेदीचा सण, घर-सजावटीचा सण, रोषणाईचा सण, फराळाचा आणि आप्तेष्टांच्या गाठीभेटींचा सण.
साफ-सफाईची मोहीम हाती घेतली गेली कि समजत - आली दिवाळी. कौलांची, भिंतींची डागडुजी आणि जमिनीवर शेणाच लिंपण म्हणजे तेव्हाचं रिनोवेशन म्हणायला हरकत नाही, नाही? आता साफ-सफाईच्या बरोबरीने 'फ्लोअरिंग' बदलून घेणे, भिंतींना मनपसंत रंग अथवा 'वॉलपेपर' लावणे ई. हा दिवाळीच्या तयारीचाच एक भाग झाला आहे. नवीन चादरी, पडदे, उश्यांचे आभ्रे ह्या गोष्टींना तर दिवाळीत खास महत्व असते. फरक एवढाच आहे - पूर्वी ह्या गोष्टींना 'डीजायनरपणा' भरतकाम/ विणकाम ह्यामुळे येइ तर आता तो 'प्रॉडक्ट डिजायनरच्या' कृपेने येतो.
दिव्यांच्या सणासाठी पणत्यांची आरास तर आतादेखील होते, पण 'इलेक्ट्रिक' रोषणाईच्या बरोबरीने. घरगुती कंदिलाला आता ओरिसातील कापडी कंदिलापासून ते थेट चायनीज कंदिलापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आणि ह्या सर्वांच्या सोबतीला असतात आकर्षक दिवे जे फक्त दिवाळीतच नाही तर नेहमीच घर प्रकाशमय ठेवत घराची शोभादेखील वाढवतात.
रांगोळीशिवाय दिवाळीची कल्पनाच नाही करता यायची पूर्वी. घरातील गृहिणीस वा कुमारीकेस 'आदर्श' वा 'सर्वगुणसंपन्न' असं बिरुद तेव्हाच मिळे जेव्हा ती इतर निकषांबरोबरच रांगोळीच्या निकषावर उत्तीर्ण होइ. रांगोळी काढण्याची कला अवगत असणारी आणि त्या कलेची आवड असणारी मंडळी आजदेखील आहेत. मात्र दिवाळीनिमित्त घरात रंगांची पखरण करण्यासाठी आता फक्त रांगोळी ह्या कलेवर अवलंबून राहावे लागत नाही, एवढेच. घरातील भिंतींना मनपसंत रंग लावता येतो. दोन वा अधिक रंगांचा आणि 'टेक्श्चर' चा वापर करत घरातील प्रत्येक खोलीला आकर्षक बनवता येते. रंगसंगती अधिक आकर्षक करण्यासाठी 'वॉलपेपर', 'लॅमिनेट', 'पॅनेल' व 'टाइल्स' ई. ह्यांचा योग्य वापर खूपच उपयुक्त ठरतो.
फुलांची आरास, तोरण ह्यांच्या रूपाने पूर्वी घर सुशोभित केलं जायचं. आजदेखील झेंडूच तोरण दारी लागतच दिवाळीत. पण त्याचबरोबरीने घर-सजावटीसाठी उपलब्ध असलेल्या असंख्य पर्यायांचा मोठ्या हौसेने वापर केला जातो.
दिवाळीच्या फराळाला मात्र काही पर्याय नाही. चकली, चिवडा, करंजी, लाडू आणि शेव ह्या आणि अशा अनेक दिवाळीच्या खास पदार्थांचा आवडीने फडशा पाडला जातो ह्या दिवसांत - पूर्वीसारखाच. मात्र हा फराळ घरीच बनला असेल कि नाही ते काही सांगता नाही येत. बऱ्याचदा विकतचाच असतो फराळ.
कपड्या-दागिन्यांची हौस तशीच - पूर्वीसारखीच. मात्र कपड्यांची निवड आजच्या आवडीनुसार. शिवाय आजकाल 'स्मार्ट फोन' किंवा तत्सम उपकरणे हि दागिन्यांनइतकीच महत्वाची मानली जातात आणि त्याच थाटात मिरवली देखील जातात. त्यामुळे सराफाच्या दुकानाइतकीच गर्दी 'इलेक्ट्रोनिक्स' च्या दुकानात असते. उटण्याबरोबरच मोती साबणसुद्धा महत्वाचा आता. आणि मिठाईच्या बरोबरीने 'चॉकलेट्स' व 'कुकीज' ह्यांना महत्व आले आहे. पारंपारिक थाट आणि नाविन्याची आस ह्याचा प्रत्यय येतो आता दिवाळीमध्ये.
शास्त्रीय/ सुगम संगीताच्या मैफिलीबरोबरच दिवाळीचा मुहूर्त साधत प्रदर्शित केलेला चित्रपट/ 'मॉल' मधील फेरफटका हे मनोरंजनाचे पारंपारिक व आधुनिक असे दोन्ही प्रकार उपलब्ध असतात आता. दिवाळीचा किल्ला हळूहळू दिसेनासा होऊ लागला आहे, पण दिवाळीच्या सुट्टीचे निमित्त साधून सुरु केलेली अनेक शिबिरे शाळकरी मुलांच्या कलागुणांना पैलू पाडण्याच काम करताना दिसतात.
जुन्या काळातील दिवाळी असो वा आत्ताच्या काळातील, ती साजरी करणारी पिढी आम्हा तरुणांची असो वा तुम्हा वडिलधाऱ्यांची; दिवाळीच्या निमित्ताने आप्तेष्टांबरोबर चार आनंदाचे क्षण उपभोगता यावेत हीच तर प्रत्येकाची इच्छा! आपली सर्वांचीच इच्छा पूर्ण होवो ही आशा करत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे.
शुभ दीपावली
Wishing all our clients & well-wishers a Happy & Prosperous Diwali
- Amol Vishwas Joshi
Interior Designer, AAkruti Interiors
Kandivli, Mumbai || 9967534621 || www.aakrutiinteriors.co.in
No comments:
Post a Comment